साखरवाडी, पुढारी वृत्तसेवा
साखरवाडीकरांसाठी लवकरच आनंदाची बातमी मिळणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे २६ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता फलटण येथे होणाऱ्या भव्य जाहीर सभेत साखरवाडीसह संपूर्ण फलटण तालुक्यासाठी महत्त्वाच्या प्रकल्पांची घोषणा व शुभारंभ करणार असल्याची माहिती माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी दिली.ते साखरवाडी येथे नव्याने उभारण्यात आलेल्या भारतीय जनता पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. या प्रसंगी जेष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे पाटील, युवा नेते धनंजय साळुंखे पाटील, अमरसिंह नाईक निंबाळकर, जयकुमार शिंदे, विश्वासराव भोसले, साखरवाडीचे माजी सरपंच विक्रसिंह भोसले, माणिक अप्पा भोसले, डी. के. पवार, सागर कांबळे,अमित रणवरे, सुरेश नाना भोसले, माजी उपसरपंच अक्षय रुपनवर, दादा गायकवाड,बाळासाहेब कुचेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
रणजितसिंह नाईक निंबाळकर म्हणाले, “फलटण तालुक्याच्या विकासासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे. २६ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या सभेत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनेक महत्त्वाच्या योजनांचा शुभारंभ व उद्घाटन समारंभ होणार आहे. यामध्ये नीरा देवघर कालव्याच्या पाइपलाईनच्या दुसऱ्या टप्प्याचा शुभारंभ, पाडेगाव–साखरवाडी रस्ता, साखरवाडी येथील तहसील कार्यालय व पोलीस निरीक्षक कार्यालय शुभारंभ फलटण–माण–दहिवडी रस्त्याचा शुभारंभ, फलटणमधील नवीन उपजिल्हाधिकारी कार्यालय तसेच तलाठी व मंडळ कार्यालय शुभारंभ व बाणगंगा नदी स्वच्छता प्रकल्प (अमृत योजना) अशा अनेक विकास कामांचा समावेश आहे.”
यावेळी जेष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे पाटील म्हणाले, “साखरवाडीतील कार्यकर्त्यांची अनेक दिवसांपासून या ठिकाणी जनसंपर्क कार्यालय उभारण्याची मागणी होती. फलटण तालुक्यात साखरवाडी हे राजकीयदृष्ट्या महत्त्वाचे केंद्र असल्याने कार्यकर्त्यांना येथे संवादाचे आणि समन्वयाचे एक स्थायी ठिकाण आवश्यक होते. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता या कार्यालयामुळे पक्ष संघटन अधिक बळकट होईल,” असे त्यांनी नमूद केले.साखरवाडीतील हे कार्यालय आता कार्यकर्त्यांच्या भेटीगाठींचे, नियोजनाचे आणि जनसंपर्काचे केंद्र ठरणार आहे. येत्या २६ ऑक्टोबरला होणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या सभेकडे संपूर्ण फलटण तालुक्याचे लक्ष लागले आहे.


